आम मुद्देताज्या घडामोडी

आंबा व केळी वृक्ष लागवड जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते

परभणी प्रतिनिधी. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत जिंतुर तालुक्यातील मौजे गणपुर येथे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी मौजे गणपुर येथील शेतकरी उत्तम काष्टे यांच्यासह इतर लाभार्थ्यांच्या शेतात 35 हेक्टर क्षेत्रावर आंबा तर मौजे माक येथील मुसब्बिर खान रहिम खान पठाण यांच्या 4.41 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवडीची‍ सुरुवात करण्यात आली.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, तहसिलदार सखाराम मांडवगडे, तालूका कृषि अधिकारी शंकर काळे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मौजे गणपुर येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, बदलत्या वातावरणांमुळे आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिक पध्दती सोडून फळबाग लागवड करणे आवश्यक आहे.

कृषि विभागामार्फत आता फळबाग लागवडीकरीता विविध योजना शेतऱ्यांसाठी शासनाने सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व उत्पन्नाच्या हमीसाठी फळबाग लागवड महत्वाची आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पध्दती सोडून फळबाग लागवडीचा विचार करणे ही काळाची गरज आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास नक्कीच मदत होईल. पाण्याची उपलब्धता पोषक वातावरण असतानाही शेतकरी पारंपरिक पिकांचेच उत्पादन घेत आहे. फळबाग लागवडीसाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून अनुदान देवून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करण्याऐवजी फळबाग लागवड करावी. तसेच शेतकऱ्यांना तुतीची झाडे लावण्याचे देखील आवाहन करण्यात येत आहे. यामुळे रेशीम उद्योगाला चालना मिळून, त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल. तसेच फळझाडे लागवडीमुळे शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे.

वृक्ष लागवड कार्यक्रमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे ही श्रीमती गोयल यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्रामस्थ, कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती

Share now