आम मुद्देताज्या घडामोडीमनोरंजन

परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील वृक्ष लागवड

परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते पुर्णा तालुक्यातील फुलकळस, चुडावा आणि हिवरा येथील वृक्ष लागवड

पुर्णा प्रतिनिधी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यात वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येत असून, पुर्णा तालुक्यातील फुलकळस, चुडावा बु. आणि हिवरा या गावात दि.1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली.


यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी घनवृक्षलागवड, शेतकऱ्यांच्या शिवारात फळबाग लागवड, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड, शाळा परिसर आणि चुडावा रेल्वे स्टेशन परिसर अशा विविध ठिकाणी वृक्ष लागवड केली.


वृक्ष लागवड मोहिमेत जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदिप घोन्सीकर, पुर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर, गट विकास अधिकारी सुनिता वानखेडे यांच्यासह फुलकळस, चुडावा आणि हिवरा येथील सरपंच यांची उपस्थिती होती.


यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या की, जिल्ह्यामध्ये 1 जुलैपासून वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता सोयाबीन व कापूस हे पारंपारिक पिक सोडून फळबाग लागवड करणे ही काळाची गरज आहे.

फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यास देखील मदत होणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ हे अभियान 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ध्वज संहितेचे पालन करुन आपल्या घरावर तिरंगा फडकावयाचा आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सामील व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.


यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे म्हणाले की, वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संवर्धन करणे महत्वाचे आहे. वृक्ष लागवड न करता त्याची जोपासना प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. जागतिक पर्यावरणात होत असलेल्या बदलाचा परिणाम थांबविण्यासाठी वृक्ष लागवड करुन, ती जगविणे ही काळाची गरज आहे.
यावेळी संबंधित गावातील ग्रामसेवक, तालुका कृषी अधिकारी, मुख्याध्यापक, विद्यार्थी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Share now