परभणी जिल्ह्यातील सात नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना जाहिर
आक्षेप, हरकती, सूचना असल्यास मुदतीत सादर करण्याचे आवाहन
संपादक शेख इफ्तेखार बेलदार. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात माहे डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 मध्ये मुदत संपलेल्या गंगाखेड, जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ व पुर्णा
या नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम-2022 जाहिर करण्यात आला आहे. या नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील तर त्यांनी कारणासह, संबंधित
नगरपरिषदांच्या मुख्याधिकारी यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात मंगळवार दिनांक .17 मार्च 2022 रोजीपर्यंत लेखी सादर करावे. मुदतीनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.
या कार्यक्रमानुसार या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आालेली संबंधित नगरपरिषदेची प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,1965 चे कलम 10 नुसार रहिवाशांच्या
माहितीसाठी संबंधित नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.अशी माहिती परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली आहे