पाथरी येथे एकाच दिवसात दोन ठिकाणी गुटखा माफियावर धाडी
संपादक अहमद अन्सारी. दिनांक .१० पाथरी शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंचायत समिती कार्यालयासमोरील व्यापारी संकुलात असलेल्या एका दुकानातून ५९०४० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाथरी शहर पंचायत समिती कार्यालयासमोरील व्यापारी संकुलात असलेल्या एका दुकानात गुटखा असल्याची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या दरम्यान छापा टाकला. ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेला ५९ हजार ४० रुपये किमतीचा सुगंधी पान मसाला आणि माणिकचंद गुटखा जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक नरहरी यांच्या फिर्यादीवरून पाथरी येथील अशोक रामचंद्र नवले याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२८, २७२, २७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रमाणे शहरातील जैतापूर परिसरात गुटखा विक्री होत असल्याची माहिती पाथरी पोलिसांना मिळाली असता त्यांनी सकाळी ११ वाजता एका अवैध गुटखा विक्रेत्याला अटक करून सुगंधित पान मसाला, रजनिवास व गोवा गुटखा असा ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पाथरी पोलिस ठाण्यातील संगीता नामदेव वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी किशोर गोपाळ गुगे रा.जैतापूर मोहल्ला पाथरी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२८, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पाथरी पोलीस ठाण्याचे पीएसआय के.जी. तुरनर या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करीत आहेत.