आम मुद्देताज्या घडामोडी

सकारात्मक दृष्टीकोनातून जनतेची कामे संवेदनशीलतेने करावी जिल्हाधिकारी आंचल गोयल

सकारात्मक दृष्टीकोनातून जनतेची कामे संवेदनशीलतेने करावी
-जिल्हाधिकारी आंचल गोयल

परभणी प्रतिनिधी. महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा कणा असून, महसूल विभागास त्यांच्या कामाशिवाय वेळेवर येणाऱ्या सर्व कामांचे संनियंत्रण करत कामे करावी लागतात. सकारात्मक दृष्टीकोनातून जनतेची कामे पारदर्शक आणि संवेदनशीलतेने करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी आंचल गोयल या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,

उप जिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाट, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, श्री. मांडवगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या की, महसुल विभाग ही राज्यातील सर्वात मजबूत यंत्रणा असुन, या यंत्रणेला कोणतेही काम सांगितले असता ती कधीही पाठ दाखवत नाही. महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न किंवा समस्या समजावून घेत त्यांच्या कामांना प्राधन्य देणे आवश्यक आहे.

सर्वसामान्यांसाठी शासन राबवीत असलेल्या योजनांची माहिती महसुल विभागाने शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवावी. कारण या योजना शेवटच्या माणंसापर्यंत पोहचल्याशिवाय या योजनेची फलनिष्पती होत नाही. जनतेची कामे लवकरात-लवकर व्हावीत, यासाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱयांनी त्यांच्याकडे असलेली कामे आपण लोकसेवक आहोत.

हा दृष्टिकोन समोर ठेवून करणे आवश्यक आहे. महसुल विभागाकडे कायद्याने खुप अधिकारी दिले आहेत, परंतू त्याचा वापर जनतेच्या कल्याणासाठी वापर झाल नाही तर ते सर्व व्यर्थ ठरतात. सर्व सामन्य जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याची आपल्याला संधी मिळाली असून या संधीचा सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी सदउपयोग केला पाहिजे,

असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यावेळी म्हणाल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यावेळी म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश असुन, देशातील सर्व जनतेच्या जमीनीचे संरक्षण व अभिलेखाचे जनत महसुल विभाग करत असते. तसेच महसुल विभागास दंडाधिकारी कायद्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.

या एका शब्दामुळे समाजात महसुल विभागास महत्व प्राप्त झाले असून त्याप्रती एक आदराची भावना आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसुल विभागाने आपले सर्व अभिलेखे हे संगणकीकृत केले आहे. यामुळे जनतेची कामे अचूक व वेळेत होण्यास मदत झाली असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.


अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर म्हणाले की, महसुल विभागामध्ये काम करत असतांना आपण नेहमी व्यस्त असल्याचे म्हणत असतो. परंतू ही व्यस्तता ही आपल्याकडे वेळेचे व्यवस्थापन नसल्याने असते. तसेच महसुल विभागास दंडाधिकारी या पदाबरोबर कायद्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. परंतू दैनंदिन काम करत असतांना आपण हे कायद्याचे ज्ञान हरवून बसलो आहे का ? याचा विचार होणे आवश्यक आहे.

कोणत्याही क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी हा कधीच परिपुर्ण नसतो. आपण किती चांगले काम करु शकतो हे प्रत्येकाचे कौशल्य असते. त्याकरीता आपण सतत शिकत राहिले पाहिजे. तसेच लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे देखील आपले महत्वाचे काम असल्याचे यावेळी श्री. काटकर म्हणाले.


प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी, महसुल दिन साजरा करण्यामागील उद्देशबाबत सांगत, मागील एका वर्षात महसुल विभागाने यशस्वीरित्या पार पाडलेल्या उद्दिष्टाची यावेळी सविस्तर माहिती दिली.


यावेळी महसुल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी, उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी-कर्मचारी आणि महसुल विभागातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी महसुल विभागातील विविध संघटनेचे प्रतिनिधी, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, सुधीर पाटील, दत्तु शेवाळे, शैलेश लाहोटी, तहसीलदार प्रतिभा गोरे, पल्लवी टेमकर, सारंग चव्हाण, सुमन मोरे, दिनेश झांपले, संजय बिरादार, सखाराम मांडवगडे, गोविंद येरमे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक के. एस. मठपती, सी. टी. टेकनुर यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तलाठी बालाजी बिडगर आणि तहसीलदार छाया पवार यांनी केले. तर उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी आभार मानले.


Share now