ताज्या घडामोडी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातूनपरभणी जिल्ह्याला 8 व्हेंटीलेटर झाले उपलब्ध

संपादक अहमद अन्सारी. परभणी, दिनांक . 12. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याला 8 व्हेंटीलेटर उपलब्ध झाले आहेत. या 8 व्हेंटीलेटरचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवार दि.12 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले.याप्रसंगी आमदार डॉ.राहूल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मक्का, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीस प्रातिनिधीक स्वरुपात 8 व्हेंटीलेटर्स जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी भुलतज्ज्ञ डॉ.दुर्गादास पांडे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी कल्याण कदम यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी मानले.राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी शाम सातपुते याचा कोविड यौध्दा म्हणून सत्कार राष्ट्रीय सेवा योजनेचा आवाका मोठा असून सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार दिसून येतो. महाविद्यालयीन जीवनात सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजत असतात पुढे चालून जीवनात याचा फार उपयोग होत असतो. आपल्या राज्यातील तरुणांना देशभक्ती व सामाजिक काम शिकविण्याची गरज नसून आपल्या रक्तातच ते गुणधर्म आढळुन येतात. यामुळेच शाम सातपुते या विद्यार्थ्याने कोविडजन्य परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता महत्वपूर्ण असे कौतूकास्पद कार्य केले आहे. असे गौरवोदगार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काढले.

कोविडजन्य परिस्थितीत स्वत:चा जीव संकटात घालून कोरोना रुग्णांचे जीव वाचविणे, कोरोना जनजागृती, कोरोना रुग्णांची सेवा, कोरोनाचे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मृतदेह सिलबंद करणे, कोरोना वार्डात विविध सेवा पुरविणे, रेमडेसिवीरसाठी मदत करणे असे महत्वपूर्ण कार्य शाम सातपुते यांनी केले ते कार्य कौतूकास्पद असल्याने बी.ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी शाम सातपुते या विद्यार्थ्यांचा यावेळी आई-वडिलासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.शिवराज बोकडे, डॉ. पदमा जाधव आदीची उपस्थिती होती. या कार्यक्रमास शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थींनी, एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share now